लोकसाहित्य आणि लोककला हे भारतीय लोकजीवनाचा जणू श्वास बनून राहिला आहे. त्यातूनच हजारो वर्षांची परंपरा लाभलेली आपली लोकसंस्कृती विकसीत होत गेली. येथील माणसाच्या भौतिक विकासा बरोबर लोकसाहित्य आणि लोककालांनीही हा विकास आणि बदल स्वीकारीत आपला प्रवास आजही चालू ठेवला आहे. लोकजीवनात लोकसाहित्य , लोककला आणि आध्यात्म हातात हात घालून वावरू लागल्यामुळेच त्यांचा विकास शक्य झाला. लोककलातून आध्यात्माची शिकवण देणारे आणि माणसाला दु:खापासून दूर नेणारे विविध प्रकारचे तत्वज्ञान सोप्या भाषेत किंवा बोली भाषेत जपले गेले. या कलांमधील एक कला म्हणजे "तमाशा".

महाराष्ट्राच्या मातीत रुजली आणि फुललेली "तमाशा" ही कला जगाच्या विविध भागातील रसिकांना भुरळ पाडीत आली आहे. वेळोवेळी विविध संकटाशी सामना करीत आज ताठ मानेने समाजमनात स्थान निर्माण केलेल्या या लोककलेच्या विकासात अनेकांचे योगदान आहे. त्यातीलच एक आदराने घ्यावे असे नाव म्हणजे सौ. मंगला बनसोडे.